जामखेड : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौऱ्यात दुष्काळी मदत मागणा-या शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
या वक्तव्याचे गुरूवारी दिवसभर राज्यभरात राजकीय पडसाद उमटले. मंत्री शिंदेंच्या भूमिकेवर सर्वस्तरातुन जोरदार टिका झाली. दरम्यान मंत्री शिंदेंच्या होमग्राऊंड असलेल्या जामखेड तालुक्याच्या राजकीय पिचवर मात्र गुरुवारी दिवसभर कमालीची शांतता दिसली.
मंत्री शिंदेंच्या होम पिचवरील विरोधकांवर सोशल माध्यमांतून टिका सुरू होताच खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादीने मंत्री शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवार ७ डिसेंबरला दुपारी ४ वाजताचा मुहूर्त काढला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांच्या चोंडी येथील बंगल्यासमोर जनावरे बांधून निषेध केला जाणार आहे.
पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानुसारच आम्ही हे अंदोलन करणार आहोत. पालकमंत्री माझे सोयरे आहेत. सोयर्याने केलेल्या आवाहनानुसार मी बारामतीहून चोंडीत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चोंडीत जनावरे घेऊन जाणार आहे, असे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.
(PRAHAAR)