नवी दिल्ली : दिल्लीत १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना तब्बल ३४ वर्षांनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय बदलत कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणातील बलवान खोखर, कॅप्टन भागमल आणि गिरीधारी लाल या तिघांना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवण्यात आली आहे. तर माजी आमदार महेंद्र यादव आणि किशन खोखर यांच्या शिक्षेत वाढ करत त्यांना प्रत्येकी १०-१० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी या दोघांना कनिष्ठ न्यायालयाने प्रत्येकी तीन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्यायाधीश विनोद गोयल यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कुमार यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत न्यायालयाला शरण यावे लागेल. १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमार यांची सुटका केली होती. या निकालाला सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमके काय करत होते, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयाने विचारला.
(PRAHAAR)