आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अग्रलेख : पर्यावरण संवर्धन काळाची गरज!

News

साधारण संक्रात जवळ आली की, थंडीची तीव्रता कमी होत जाते आणि सूर्य अधिक तापायला लागतो. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ लहान थोरांवर येते. मागच्या वर्षी जानेवारीपासूनच चेन्नईसारख्या मोठय़ा शहराला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले होते, तर ऐन मेपर्यंत चेन्नईतील बहुतांश हॉटेल्स, पर्यटन पॉइंटस बंद करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी काही काळापुरते स्थलांतरित होणे पसंत केले होते. महाराष्ट्रातही येत्या महिन्याभरातच दुष्काळाच्या आणि पाण्याच्या झळा लागायला सुरुवात होईल.

त्यातच राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने शेतक-यांना कर्जमाफीची फसवी घोषणा केली आहे. अद्याप शेतक-यांच्या हातात काहीही पडलेले नाही. नेमकी कर्जमाफी प्रक्रिया मार्चनंतर सुरू होणार आहे, असे झाले तर येत्या तीन महिन्यांत शेतक-यांसमोर जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचीही तितकीच गरज आहे, याकडे मात्र सर्वाचेच सोयीने दुर्लक्ष होते आहे. पावसाळ्यातील पाणीसाठा करण्यासाठी आणि त्यावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी अजूनही आपल्याकडे सक्षम यंत्रणा नाही.

त्यामुळे पावसाळ्यातील हजारो लिटर पाणी असेच वाया जाते. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुसरीकडे निसर्गाची हानी, वाढते तापमान, पावसाचा लहरीपणा, बदलत चाललेले ऋतुमान अशा अनेक कारणाने पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी शेतीही धोकादायक पायरीवर उभी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान आधीच एक अंश सेल्सियसने वाढले आहे.

यात आणखी एका अंशाची वाढ झाली, तर हिमालय आणि हिमनग वितळू लागतील आणि किनारपट्टीचा भाग पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होईल. जागतिक तापमानवाढीमुळे भयंकर नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते.

यामुळे, वैश्विक तापमान १.५ अंशांच्या पुढे जाणार नाही याची ताबडतोब तजवीज करणे गरजेचे आहे. हरितवायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान कधी नव्हे इतके जलदगतीने वाढण्यास सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे, तर समुद्रातील आम्लांशही वाढू लागला. यामुळे तापमानात थोडी जरी वाढ झाली तरी त्याचे परिणाम जागतिक हवामानावर तसेच पर्यावरणावर होऊ लागले होते. या सा-यांच्या परिणामी अधिक तापमान असलेले दिवस, चक्रीवादळे, पूर, हिमवृष्टी, दुष्काळ, समुद्राची जलपातळी वाढणे अशांसारखी अनेक संकटे येऊ लागली आहेत.

जागतिक हवामानात होणा-या बदलांमुळे शेती उत्पादन, जलपुरवठा, उद्योग यांना तर फटका बसतोच, शिवाय माणसाच्या जीवनक्रमातही अनेक बाधा उत्पन्न होतात. जैविक साखळी तसेच प्राण्यांच्या प्रजाती यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. कोळसा आणि पेट्रोलियमच्या अतोनात वापरामुळे हवेतील कार्बन उत्सर्जन वाढत असून, हे प्रमाण आता तब्बल ४०० पीपीएमवर पोहोचले आहे. वातावरणात कमाल ३०० पीपीएमपेक्षा जास्त प्रमाण कार्बन उत्सर्जन अपेक्षित नाही. यामुळे जागतिक तापमानवाढीला चालना देणा-या वायू उत्सर्जनाला आळा घालणे हे आगामी दशकापुढील सर्वात मोठे आव्हान आहे.

कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासोबतच याअगोदरच पर्यावरणात साठत गेलेल्या हानिकारक घटकांचा नाश करण्याची समस्या पुढय़ात उभी आहे. उत्सर्जनातून बाहेर पडलेले घटक समुद्रात विरघळण्यासाठी तब्बल २०० वर्षाचा कालावधी लागतो. भविष्यात येऊ घातलेल्या मोठय़ा हवामान बदलांवर उपाययोजना करणे हेदेखील या दशकापुढे असलेल्या मोठय़ा आव्हानांपैकी एक आहे.

जगभरातील अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था हवामान बदलांवर अंकुश ठेवण्यासाठी गेली तीन दशके प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात १९९२ साली आयोजित करण्यात आलेली ‘रिओ कॉन्फरन्स’ असो वा अगदी अलीकडे २०१६ साली झालेला पॅरिस करार, हवामान बदल रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. पर्यावरण जागरूकतेसंदर्भातील आपल्या सर्वाची वैयक्तिक पातळीवरील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यात झाडे आणि जंगलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

सध्या सुरू असलेली वृक्षतोड थांबवत जंगलांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने याच्याकडे चळवळीच्या दृष्टिकोनातून पाहत वनसंवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. केवळ वृक्षारोपण करून थांबणे महत्त्वाचे नाही. आपण लावलेल्या रोपाचे मोठय़ा वृक्षात रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायला हवी. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने हवामानात मोठय़ा प्रमाणावर कार्बन सोडतात. यामुळे येत्या दशकभरात विजेवर चालणा-या वाहनांचा वापर अपरिहार्य आहे. अनेक कंपन्या येत दोन-पाच वर्षात पेट्रोल व डिझेलवर चालणा-या वाहनांचे उत्पादन थांबविण्याचा विचार करीत आहेत. संपूर्ण जग सौर आणि पवन स्रोतांच्या वापराकडे वळताना दिसत आहे.

खासगी वाहनांना चिकटून राहण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा पुरेपूर वापर आवश्यक आहे. एकावेळी चार ते पाच जणांना नेऊ शकणा-या मोटारीतून केवळ एकटय़ाने प्रवास करून इंधनाचा अपव्यय टाळावा. जर मोटारीने प्रवास करायचाच असेल, तर त्याच मार्गावरून प्रवास करणा-यांना तुम्ही सोबत नेऊ शकता. त्याचप्रमाणे, मोटारीपेक्षा चालत किंवा सायकलवरून देखील इच्छित स्थळी पोहोचण्याचा पर्याय वापरायला हवा. घरापासून कार्यालयाचे अंतर कमी करा, शक्य असल्यास तुमच्या कार्यालयाजवळच राहायची व्यवस्था होत असेल, तर पाहा, जेणेकरून वाहनांचा वापर कमी होईल आणि प्रदूषणदेखील.

तुमचे घर आणि कार्यालय बांधतानादेखील पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. घर आणि कार्यालयासाठी अशा जागेचा शोध घ्या जी हवेशीर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल आहे. त्याचप्रमाणे, पावसाचे पाणीदेखील साठवण्याची सोय व्हायला हवी. आपल्याकडे कायम प्लास्टिकच्या बाबतीत, त्याचा वापर कमी करण्याचा किंवा पुनर्वापर करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्यापेक्षा प्लास्टिकचा वापरच टाळणे योग्य राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या २०३० पर्यंत वातावरणातील हरितवायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण ४५ टक्क्यांवर आणून २०५० सालापर्यंत हे प्रमाण शून्यावर आणण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा मानस आहे.

जागतिक तापमानवाढ कमी करण्यात याचा फायदा होणार आहे. तापमान वाढीला मानवी चुकाच कारणीभूत असल्याचा ठपका अनेक तज्ज्ञांनी आजवर ठेवला असला तरी सुधारेल तो मानव काय..! यानुसार आपण अधिकच चुका करीत आहोत. आपल्या पुढच्या पिढीसाठी किमान काही प्रमाणात ऑक्सिजन, स्वच्छ हवा तरी आपण राखू की नाही, याचा विचार आता प्रत्येकाने करायला हवा.

(PRAHAAR)

79 Days ago

Download Our Free App