आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार गटातील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेतील कोलंबो इथं काल झालेल्या या सामन्यात पावसानं वारंवार व्यत्यय आणला. भारतीय संघानं ३५७ धावांचं मोठं आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानच्या संघाला ३२ षटकांमध्ये केवळ १२८ धावांवर रोखण्यात भारतीय क्रिकेटपटूंना यश आलं. भारताच्या धावसंख्येत विराट कोहली आणि के एल राहूल यांच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता; कोहलीनं ९४ चेंडूत १२२ धावा तर राहूलनं १०६ चेंडूत १११ धावा केल्या. २६७ सामने खेळताना १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा कोहली हा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला आहे. यापुर्वी सचिन तेंडूलकरने ३२१ सामन्यात हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० षटकांच्या सामन्यातील कोहलीचं हे ४७ वं शतक होतं. कुलदीप यादवने ५ बळी घेतले. (AIR NEWS)