A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

इयत्ता दहावीची आजपासून परीक्षा

news

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला राज्यात आजपासून सुरुवात होत आहे. ती 25 मार्चपर्यंत चालेल. 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यात 8 लाख 44 हजार 116 मुलं आणि 7 लाख 33 हजार 67 मुली असल्याची माहिती काल मंडळाच्या वतीनं देण्यात आली.

राज्यातील 5 हजार 33 केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत, तसेच यंदापासून प्रथमच लेखी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूचीचं आणि उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचं वाचन करण्याबाबत सर्व माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. तसेच यंदापासून परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका न वितरीत करता निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रकाशित आणि छपाई केलेलं वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. (AIR NEWS)

24 Days ago