A part of Indiaonline network empowering local businesses

चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रीया प्रगतीपथावर

news

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंगेली इथं प्रचारसभा घेतली.महासमंद जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रधानमंत्री प्रचारसभा घेणार आहेत.त्याचवेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याही अनेक ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत.काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उद्या रायपूर इथं तर राहुल गांधी बुधवारी १५ तारखेला बेमेतारा इथं प्रचारसभा घेणार आहेत.छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून दुसऱ्या टप्प्यातलं मतदान येत्या १७ तारखेला होणार आहे.तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्जांची छाननी केली जाणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे.तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी मतदारांच्या अंतिम याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रथमच महिलांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक झाली आहे.राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि समावेशक करण्यासाठी निवडणूक आयोग विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे.याचाच एक भाग म्हणून दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या दुर्गम आणि विरळ लोकसंख्या असलेल्या भागातही मतदान केंद्रांची सोय करण्यात येत आहे.मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आता नजीक येऊन ठेपल्या आहेत.मध्य प्रदेशात १७ तारखेला मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सुरु असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज सहा ठिकाणी सभा होणार आहेत.या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने राज्यात पहिल्यांदाच क्यु आर कोड असलेल्या मतदार माहितीपात्रीका वितरीत केल्या आहेत.मतदाराच्या छायाचित्राच्या ऐवजी क्यू आर कोड छापण्यात आला आहे.या कोड द्वारे मतदारांना त्यांचा मतदान केंद्र क्रमांक,राज्य तसंच जिल्हा हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती मिळू शकेल.मिझोराम,छत्तीसगढ,मध्य प्रदेश,राजस्थान आणि तेलंगणा या पाचही निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. (AIR NEWS)

26 Days ago