टर्की आणि सिरीयामध्ये काल झालेल्या भुकंपातील बळींची संख्या 7 हजारापेक्षा अधिक झाली आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. उणे तापमानात शोधपथके पीडीतांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतले असून, आंतरराष्ट्रीय मदत टर्कीमध्ये पोहोचत आहे. या परिसरात 7 पूर्णांक 8 रिख्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर हजारो इमारती कोसळल्या.
धातू आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून, उणे तापमानामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या जीविताची चिंता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखालून 8 हजार लोकांना वाचवण्यात यश आले असून, सुमारे 4 लाख निर्वासितांना सरकारी व्यवस्था किंवा हॉटेल्समध्ये आश्रय देण्यात आला आहे. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या 85 दशलक्ष लोकांपैकी 13 दशलक्ष लोकांना भूकंपाचा फटका बसला आहे. एर्दोगेन यांनी 10 प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. (AIR NEWS)