भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांच्या नोटा माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिक या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत चलन बदलून घेऊ शकतात. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं काल अधिसूचना जारी केली. त्यात 'स्वच्छ नोट धोरणाच्या' अनुषंगानं 2 हजार रुपयांच्या नोटा माघारी घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. लोक त्यांच्या बँक खात्यात 20 हजार रुपये मूल्याच्या मर्यादेपर्यंतच्या 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत तसंच रिझर्व्ह बँकेच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये येत्या मंगळवारपासून 30 सप्टेंबरपर्यंत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये बदलून घेऊ शकतात. 2000 रुपये मूल्याच्या 89 टक्के नोटा मार्च 2017 च्या पूर्वी चलनात आणण्यात आल्या होत्या आणि या मूल्याच्या नोटांची सध्या सर्वसाधारण देवाणघेवाण फार होत नव्हती, असं रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं आहे. (AIR NEWS)