स्वतःचं सामर्थ्य, क्षमता ओळखा; आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर वेळेप्रति जागरुक रहा, आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा या वार्षिक कार्यक्रमाच्या सहाव्या भागात मोदी यांनी काल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अतिशय सूचक उत्तरं पंतप्रधानांनी दिली.
कुटुंबियांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा बाळगणं स्वाभाविक आहे, मात्र मुलांच्या परीक्षा आणि संबंधित निकाल हे सामाजिक प्रतिष्ठेचा विषय असू नये असं ते म्हणाले. आपली ऊर्जा सकारात्मक पद्धतीनं वापरून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि व्यक्तिमत्व मिळालं आहे, मोबाईलसारख्या साधनांचा गुलाम होऊन ते गमावू नका असं पंतप्रधान म्हणाले.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण देशभरांतील विविध शाळांमधून करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील किसन नगर महापालिका शाळा क्रमांक 23 मध्ये उपस्थित राहून पंतप्रधानांचे विचार दूरस्थ पद्धतीनं ऐकले आणि त्यानंतर तिथे उपस्थित विद्यार्थ्यांशी संवादही साधला. याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्तानं आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जागवल्या. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण घेऊ नका असा सल्ला दिला. देशवासियांना कुटुंबीय मानणारे पंतप्रधान आपल्याला लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधानांनी लिहिलेलं एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसंच राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या न्यू इंग्लिश स्कूल इथून या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभाग घेतला. शाळेतील उत्साही वातावरण, लहान विद्यार्थी मित्र-मैत्रिणी, एनसीसीचे शिस्तबद्ध छात्र आणि ज्येष्ठ शिक्षकगण पाहून आपलेही मन लहानपणच्या शाळेच्या रम्य आठवणींमध्ये बुडून गेले. असे भावनिक उद्गार फडणंवीस यांनी यावेळी काढले. (AIR NEWS)