प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी पापुआ न्यू गिनी इथं पोहोचले. त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोरेसबी बंदरावर त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सैनिक सलामी देण्यात आली. भारतीय पंतप्रधानांनी पापुआ न्यू गिनीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे समपदस्थ जेम्स मारापे यांनी आज हिंद-प्रशांत बेट सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेचं यजमानपद भूषवलं. 2014 मध्ये मोदी यांच्या फिजी भेटीदरम्यान स्थापना करण्यात आलेल्या या परिषदेत भारत आणि प्रशांत महासागरातल्या 14 बेट देशांचा समावेश आहे.
त्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जपानच्या हिरोशिमा इथं झालेल्या जी-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर यूकेचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्याशी दोन देशांदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा केली. भारत-यूके मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींचाही त्यांनी आढावा घेतला. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याशीही प्रधानमंत्र्यांची बैठक झाली. या दोन देशांदरम्यानचे व्यापार संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश प्रयत्न करत राहतील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी ट्वीट संदेशातून दिली. कृषी आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणं, तसंच स्थानिक घडामोडींवरही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. (AIR NEWS)