A part of Indiaonline network empowering local businesses

भारताला ऊर्जा निर्यातक्षम देश बनवण्याचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं नितीन गडकरी यांच प्रतिपादन

News

वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण लक्षात घेता, प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीनं किफायतशीर इंधन पर्याय शोधणं आणि त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. मुंबईत हायड्रोजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एनसर्कल सर्व्हिसेसच्या वतीनं आयोजित हरित हायड्रोजन कॉन्क्लेव्ह-जीएच २ चे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. बायो सीएनजी, हरित हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनांमुळे प्रदूषण कमी व्हायला मदतच तर होतेच यासह इंधन खर्चातही मोठी बचत होते याकडे नितीन गडकरी यांनी लक्ष वेधलं.

ही इंधनं लोकांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या क्षेत्रातल्या संबंधितांची आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. प्रदूषणासह जिवाश्म इंधनांची होणारी लाखो कोटींची आयात ही देखील चिंतेची बाब आहे. देशात हवेसह पाणी आणि ध्वनी प्रदूषणाची समस्यां मोठी आहे त्यामुळे आयातीला पर्याय देणारी, किफायतशीर, प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण स्नेही स्वदेशी उत्पादनांची अधिकाधिक निर्मिती झाली तर आत्मनिर्भर भारताचा आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आपण औष्णिक ऊर्जा, जल विद्युत, पवन उर्जा इत्यादींवर खूप वेगानं काम करत आहोत. पण त्याच वेळी आपण अणु ऊर्जेकडे देखील लक्ष ठेवले पाहिलं असं गडकरी यांनी नमूद केलं. यावेळी जपान, जर्मनी आणि नॉर्वेचे प्रतिनिधी आणि महावाणिज्यदूत यांच्यासह या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. (AIR NEWS)

6 Days ago