A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

महायुतीत रत्‍नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटला, किरण सामंत की नारायण राणे झाला निर्णय

News

लोकसभा निवडणुकीत महायुतीत काही जागांवर असलेला तिढा अजूनही सुटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गढ असलेल्या ठाणे, कल्याण तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि रत्नागिरी-सिंदुदुर्गचा निर्णय अधिकृतरित्या जाहीर होत नाही. परंतु कोकणातील तिढा आता सुटणार असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे किरण सामंत (Kiran Samant) माघार घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. स्वत: किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली. फेसबुकवर टाकलेली पोस्ट मात्र नंतर काढण्यात आली. परंतु व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर किरण सामंत यांच्या माघारीची पोस्ट कायम आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
भाजपचा दावा मजबूत
सिंधुदुर्ग- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे असणार आहे. त्यांची उमेदवारी आज घोषीत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याकडून दावा केला जात होता. भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा केली जात होती. नारायण राणे यांना यामुळेच राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते. मात्र आता किरण सामंत यांनी स्वतःहून या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले.

काय म्हटले किरण सामंत यांनी
मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि अबकी बार ४०० पार करण्यासाठी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याची पोस्ट फेसबुकवर किरण सांमत यांनी आज सकाळी टाकली. त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट केली. परंतु किरण सांमत यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही पोस्ट कायम ठेवली. ती मात्र डिलिट केली नाही. यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात विनायक राऊत-नारायण राणे यांच्यात सामना रंगणार आहे.

10 Days ago