आदिवासींनी निसर्गाशी जोपासलेलं नातं आणि त्यांची जीवन जगण्याची कला अद्भुत आहे. देशवासियांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि त्यांच्यासोबत मिळून त्यांच्या समग्र विकासासाठी कार्य केलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मागास समूहाच्या उत्थानात शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण आहे. हा समूह पुढे जाऊ इच्छितो. मात्र, त्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे आणि गोंडवाना विद्यापीठाने त्यादृष्टीने उचित पावले उचलली आहेत, असे सांगून श्रीमती मुर्मू यांनी विद्यापीठाचं कौतुक केलं. केंद्र सरकारने आकांक्षित जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हृयाचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात हा जिल्हा प्रगत जिल्ह्यांच्या पहिल्या रांगेत येईल, असा विश्वासही मुर्मू यांनी व्य्क्त केला.प्रतिभा आणि प्रयत्नांनी विकासाचा अध्याय लिहावा लागतो , असा कानमंत्र त्यांनी यावेळी युवकांना दिला.
राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे कार्क्रमाला उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दीक्षांत समारंभात सुमारे ४५ पदवीधर आणि ६१ टक्क्यांपेक्षा जास्त सुवर्णपदक विजेत्या या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनींची कामगिरी ही कौतुकास्पद असून इतर विद्यार्थिनींना यापासून प्रेरणा मिळेल. असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. गोंडवाना विद्यापीठ हे या क्षेत्रातील वनसंपदा, खनिज संसाधन, आदिवासींची कला आणि संस्कृतीच्या योग्य विकास आणि संरक्षणासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. गोंडवाना विद्यापीठामध्ये अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी बांबू क्राफ्ट, वनव्यवस्थापन यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून या विद्यापीठात आदिवासी संशोधन केंद्र सुद्धा कार्यरत आहे, या केंद्रात स्थानिक दृष्ट्या उपयोगी विषयावर संशोधन केलं जात आहे, असे राष्ट्रपती यांनी सांगितले. राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. विशेषदृष्ट्या असुरक्षित आदिवासी समुदायासोबत आपण वेळोवेळी संवाद साधत असून गेल्याच महिन्यात राष्ट्रपती भवनात या आदिवासी समुदायातल्या बांधवांना आपण आमंत्रित केलं होतं, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते अडपल्ली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं दूरस्थ पद्धतीने भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. या समारोहाला विद्यापीठाचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. नागपूरातल्या महालक्ष्मी मंदिरात भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटनही आज राष्ट्रपतींनी केलं. मातृभूमी, मातृभाषा आणि मा हे आपल्यासाठी महत्त्वाचे असून आपण परिवार, समाजात आपल्या मातृभाषेतच वापर केला पाहिजे. दुसरी भाषा सुद्धा शिकायला हवी परंतु आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. रामायणातील जीवन मूल्ये संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे, असं त्यांनी सांगितलं.राष्ट्रपतींनी आज सिध्दीविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी राज्यपाल रमेश बैस देखील उपस्थित होते. सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. संध्याकाळी राजभवन इथं राष्ट्रपतींचा नागरी सत्कार होत आहे. उद्या त्या शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.राष्ट्रपती मुर्मू यांनी आज नागपूरच्या विधानभवनात अल्पसंख्य आदिवासी समुदायांशी संवाद साधला. विदर्भ आणि राज्यातल्या इतर आदिवासी पट्ट्यातून हे आदिवासी जमले होते. (AIR NEWS)