मुंबईत १ जानेवारी २ हजार ते २०११ या काळातल्या झोपडी धारकांना राज्य शासनानं मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं झोपडीच्या बदल्यात केवळ अडीच लाखात घर देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज हा निर्णय जाहीर केला. या बाबत राज्यसरकारतर्फे आज परिपत्रक जारी केलं. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य सरकारनं आता जुन्या चाळींचा रखडलेला मुद्दा देखील लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. सशुल्क घराची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केली जात होती. मात्र अनेक कारणांमुळे या मागणीचा विचार केला जात नव्हता. आता या झोपडीवासियांना देखील स्वत:चं हक्काचं घर मिळेल, असं फडनवीस यांनी सांगितलं. नव्या योजनेसाठीच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्याची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. (AIR NEWS)