यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या १२२ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. या पार्श्वभूमीवर चारा, वैरण, पिण्याचे पाणी यासाठी कृषी, महसूल आणि संबंधित विभागांनी नियोजन करावं, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. राज्यात ९१ टक्के म्हणजे १३९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. राज्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले ६ जिल्हे असून, ७५ ते १०० टक्के पाऊस झालेले १३ जिल्हे आहेत. राज्यातल्या १५ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून १३ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. सध्या राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात सुमारे ६२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास सुमारे ८१ टक्के पाणीसाठा होता. सध्या राज्यात ३२९ गावे आणि सुमारे तेराशे वाड्यांमध्ये साडे तीनशे टँकर सुरू आहेत. येत्या काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. (AIR NEWS)