Promote your Business

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान

news

नवी दिल्ली : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ५५ जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबत घोषणा केली. या ५५ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. १७ राज्यांमधील राज्यसभेच्या ५५ सदस्यांसाठी निवडणूक २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले.

राज्यसभेतील ५५ खासदार एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत. हे खासदार भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांचे आहेत. सध्या राज्यसभेत २४५ खासदार आहेत. रिक्त होणा-या राज्यसभेच्या जागांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल तामिळनाडूतील ६, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी ५ जागा रिक्त होत आहेत.

यंदा महाराष्ट्रातील जे ७ सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – शुक्रवार, १३ मार्च २०२० असून उमेदवारी अर्ज पडताळण्याची अंतिम तारीख १६ मार्च आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १८ मार्च आहे. निवडणुकीची तारीख २६ मार्च असून या दिवशी सकाळी ९ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी २६ मार्चरोजी होईल.

राज्यसभेतील खासदार कसे निवडले जातात?
राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असतात. त्यापैकी १२ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असतो. तर उर्वरित २३८ सभासदांची निवड राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधीमंडळ आमदार करतात. राज्यसभा खासदारांची निवड थेट जनतेतून नाही, तर विधानसभेवर निवडून गेलेले आमदार करतात.

प्रत्येक राज्याला जागांची संख्या ठरवून दिलेली असते. त्या जागांसाठी कोणता खासदार निवडायचा, यासाठी आमदारांची मतं घेतली जातात. कोणत्या राज्याचे किती खासदार राज्यसभेवर निवडून जाणार हे संबंधित राज्याच्या लोकसंख्येवरुन निश्चित केले जाते. त्यामुळे राज्यसभेत सर्वाधिक आमदार उत्तर प्रदेशातील असून त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारचा क्रमांक लागतो. राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

(PRAHAAR)

35 Days ago

Download Our Free App