राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुढचे दोन दिवस रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
रायगड जिल्ह्यात आज जिल्हा प्रशासनानं शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मदत आणि बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नदी, खाडी काठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.सततचा पाऊस सुरू असल्यानं दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पळसदरी ठाकुरवाडी इथल्या कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलं आहे. नवी मुंबईत सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे.सकाळपासून १४ पूर्णांक ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून शीव पनवेल महामार्गावरची वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे प दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं धरण पूर्ण संचय क्षमतेनं भरलं आहे. काल दिवसभर पावसानं थोडीशी उघडीप दिल्यानं धरणाची पाणी पातळी स्थिर होती. आज पहाटे पावसाचा जोर वाढल्यानं सव्वा आठ वाजता धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झाला. संबंधित क्षेत्रातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान भवन परिसरात दिली. जिल्ह्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात पुराचं पाणी भरलं आहे. सद्य स्थितीत मंदीराचा केवळ कळस दिसत आहे. पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्याजवळच्या खडकवासला धरण प्रकल्पात परवा रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून काल संध्याकाळी पाच वाजता धरण ९२ टक्के भरलं. रात्री उशिरापर्यंत दोन दरवाजे उघडण्यात आले होते. हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके पाटण, महाबळेश्वर, वाई जावळी आणि सातारा या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे . संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत एनडीआरएफचं एक पथक आज कराड या ठिकाणी दाखल झाले आहे.यात २५ जणांचा समावेश असून त्यांच्याकडे आवश्यक ते सर्व साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध आहे.गेल्या चोवीस तासात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात, राज्याच्या सर्व विभागांमधे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी, जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (AIR NEWS)