राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेचं आज सकाळी बोलावलेलं विशेष अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. अधिवेशन ज्या प्रयोजनासाठी बोलावण्यात आलं होतं ते प्रयोजन आता राहिलेलं नाही त्यामुळं हे विशेष अधिवेशन संस्थगित केल्याचं विधानसभेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी काल रात्री जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची राजभवन इथं भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू पदभार सांभाळण्यास सांगितलं आहे.
तत्पूर्वी, औरंगाबाद शहराचं "संभाजीनगर" तसंच उस्मानाबाद शहराचं “धाराशीव" असं नामकरण करण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ‘लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘ असं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथं वरिष्ठ स्तर - दिवाणी न्यायालय स्थापन करणं; अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता; इत्यादि निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या गट क आणि गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षांची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याची माहिती अवर सचिव अर्चना वालझाडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. नव्यानं घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी, आधीच्या रद्द केलेल्या परीक्षेकरिता अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसेल असंही या पत्रात म्हटलं आहे.