आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्रीनिवासने जिंकली सर्वाची मने!

News

नवी दिल्ली : विज्ञान भवनात सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून ‘नाळ’ सिनेमातील चैत्या अर्थात श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

व्यासपीठावर उपराष्ट्रपती आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच श्रीनिवासला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालक सोनाली कुलकर्णी आणि दिव्या दत्ता यांनी जेव्हा श्रीनिवास पोकळेचे नाव घेतले, तेव्हा श्रीनिवास सुरुवातीला व्यासपीठाच्या पाया पडला. त्यानंतर तो उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. श्रीनिवासच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली. स्वत: व्यंकय्या नायडू यांनी व्यासपीठावर श्रीनिवासशी गप्पा मारल्या. ‘नाळ’ सिनेमाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी श्रीनिवासची ही कृती पाहिली आणि त्यांच्या चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या सिनेमाने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नाळ’च्या सुधाकर रेड्डी यांनी पटकावला. यासोबतच श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.

आयुष्मान खुराणा, विकी कौशल यांचा गौरव

नवी दिल्ली : भारतीय सिनेसृष्टीत मानाच्या समजल्या जाणा-या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण सोमवारी विज्ञान भवनात झाले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेता आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विकी कौशलला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी तर आयुष्मान खुराणाला ‘अंधाधून’ या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरविण्यात आले. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

आयुष्मान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाचे प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगलेच कौतुक झाले होते. एक डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोडय़ात टाकतो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचाही बोलबाला राहिला. ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना देण्यात आला. ‘चुंबक’ या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. ‘पाणी’ या चित्रपटासाठी पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता आदिनाथ कोठारेने स्वीकारला. ‘पाणी’ या चित्रपटाचा आदिनाथ दिग्दर्शक आहे. या सोहळ्याला माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर उपस्थित होते. अभिनेत्री दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.

अमिताभ बच्चन यांचा रविवारी गौरव
या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन यांना देखील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार होता; परंतु त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजर राहू शकले नाहीत. चित्रपट क्षेत्रात अनेक दशके दिलेल्या योगदानासाठी अमिताभ यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती स्वत: बिग बींनी एका ट्विटमध्ये दिली होती. त्यांनी सांगितले की, तापामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. येत्या रविवारी, दि. २९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी पुरस्कार विजेत्यांची भेट होणार आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी माहिती, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

(PRAHAAR)

97 Days ago

Download Our Free App