भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो - थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी-श्रीहरिकोटा इथल्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून - SSLV-D 2 चं प्रक्षेपण करणार आहे. आज पहाटे 2 वाजून 48 मिनिटांनी या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू झाली असून SSLV D2 हा प्रक्षेपक 175 किलोग्रॅम वजनाचे 3 उपग्रह घेऊन जाणार आहे. यामध्ये 156 किलोग्रॅम वजनाचा 'ई ओ एस', 10 किलो वजनाचा 'जानुस' आणि 'आझादी SAT2' या 8 किलो 700 ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचा समावेश आहे.
सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील शास्त्रज्ञ अंतिम टप्प्यातील चाचण्यांचं निरीक्षण करत असून प्रक्षेपण केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत हे तिन्ही उपग्रह पृथ्वीजवळच्या 450 किलोमीटरच्या समतल कक्षेत सोडले जातील. EOS-07 हा पृथ्वी निरीक्षणाचं काम करणार असून, जानुस 1 उपग्रह अमेरिकेच्या ANTARIS ने पाठवला आहे.
750 विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'आझादी SA -2' हा उपग्रह हौशी रेडिओ संदेश वहन आणि अंतराळातील किरणोत्सर्ग पातळी मोजण्याचं काम करेल. या आधीचे उपग्रह आपल्या समतल कक्षेतून भरकटल्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या प्रक्षेपणाची शास्त्रज्ञ विशेष काळजी घेत आहेत. (AIR NEWS)