सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित सीमा ही पहिली गरज असल्याचं सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या जोमानं आणि उत्साहानं ‘अमृत काल’ मध्ये पुढे जात आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केलं.
भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर आयोजित नौदल कमांडर्स परिषदेत भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल क्षमतेचा आढावा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी नौदल कमांडर्सशी संवाद साधला. देशाच्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी बहुआयामी मोहिमा हाती घेण्याची नौदलाची क्षमता दाखवणारी समुद्रातील ऑपरेशनल प्रात्यक्षिकं पाहिली.
कमांडर्सना संबोधित करताना, खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आणि धैर्य आणि समर्पणानं राष्ट्रीय हितांचं रक्षण केल्याबद्दल नौदलाचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. त्यांनी सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी भविष्यातील क्षमता विकासावर लक्ष देण्याचं आवाहन केलं. “भविष्यातील संघर्ष अप्रत्याशित असतील. सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेनं प्रत्येकाला पुन्हा धोरण आखण्यास भाग पाडलं आहे. उत्तर आणि पश्चिम सीमेवर तसंच संपूर्ण किनारपट्टीवर सतत जागरुकता ठेवली पाहिजे. भविष्यातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज असणं आवश्यक आहे,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
आर्थिक समृद्धी आणि सुरक्षेची परिस्थिती हातात हात घालून चालते, यावर जोर देऊन, संरक्षण क्षेत्र एक प्रमुख मागणी निर्माता म्हणून उदयाला आलं आहे, ते अर्थव्यवस्थेला चालना देत असून देशाचा विकास सुनिश्चित करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाहिलेल्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकांमध्ये जटिल विमानवाहू वाहक आणि फ्लीट ऑपरेशन्स, जहाजं आणि विमानांद्वारे शस्त्रं गोळीबाराचा समावेश होता. याशिवाय, स्पॉटर ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड लाईफबॉय आणि फायर फायटिंग बॉटसह स्वदेशी उत्पादनांचे प्रात्यक्षिक राजनाथ सिंह यांनी पाहिलं. (AIR NEWS)