A part of Indiaonline network empowering local businesses

सार्वजनिक गणेश मंडळाबरोबरच अनेक घरगुती गणपतींचंही विसर्जन

news

सार्वजनिक गणेश मंडळाबरोबरच अनेक घरगुती गणपतींचंही काल विसर्जन करण्यात आलं. यासाठी स्थानिक प्रशासनानं ठिकठिकाणी कृत्रिम हौदांची, तसंच मूर्ती संकलन केंद्रांची सोय केली होती.
पिंपरी चिंचवडमध्येही काल भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. पारंपरिक ढोल-ताशा पथकांबरोबरच शिवकालीन युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यंदा प्रथमच महापालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्तालयातर्फे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाचं ध्वनीचित्रमुद्रण करण्यात आलं.
मुंबईत गणेशगल्लीचा राजा, तेजूकाया, चिंतामणी, लालबागचा राजा या प्रसिद्ध गणपतींच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
पुण्या-मुंबईबरोबरच राज्याच्या अन्य भागातही काल सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणुका काढत गणरायाला निरोप दिला.
नाशिक महापालिकेनं पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी 27 नैसर्गिक ठिकाणं निश्चित केली होती; तसंच 54 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले होते. मूर्तीदान केंद्रांमध्येही हजारो घरगुती गणेश मूर्तींचं दान करण्यात आलं.
हिंगोलीमध्ये विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदकोत्सव दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा होतो. यंदाही महाराष्ट्रासह परराज्यातून चिंतामणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक हिंगोलीत दाखल झाले होते.
नंदुरबार जिल्ह्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांचा हरिहर भेटीचा सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. नंदुरबार श्रीराम सेना मित्र मंडळानं सादर केलेलं गोफ नृत्यही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं. जालना, नांदेड, धुळे, जळगाव, गोंदिया, वाशीम इथंही, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत वाजत-गाजत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
गणेश विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेनंही यासाठी विशेष व्यवस्था केली होती. पुणे मेट्रो पहाटे दोनपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. (AIR NEWS)

71 Days ago