सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर तिस्ता नदीच्या खोऱ्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळं अचानक आलेल्या पुरात पाकयोंग जिल्ह्यात 23 लष्करी जवानांसह 59 लोक बेपत्ता झाले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. लष्कराकडून शोध आणि बचाव कार्य सुरू असून, आतापर्यंत एका जवानाला वाचवण्यात यश आलं आहे. त्रिशक्ती तुकडीच्या जवानांनी बेपत्ता झालेल्या सैनिकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे, मात्र संततधार पाऊस, तीस्ता नदीत वेगानं येणारं पाणी आणि अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळं त्यात अडथळे येत आहेत.
सिंगताम आणि रांगपो सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे. माळी गाव गृहनिर्माण संकुल; सिक्कीम डिस्टिलरीज, रंगपो पर्यटक माहिती केंद्र आणि गोलितारमधील नेपाळी धर्मशाळा यासह विविध शाळांमध्ये मदत शिबिरं उभारण्यात आली आहेत. बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली असल्याचंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. दरम्यान, सिक्कीम आणि उत्तर बंगालमध्ये तैनात असलेले लष्कराचे सर्व कर्मचारी सुरक्षित असून, मोबाईलवरून संपर्क साधण्यात अडथळा येत असल्यानं ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत नसल्याचंही प्राधिकरणानं कळवलं आहे. (AIR NEWS)