आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

सिडकोच्या गृहप्रकल्पाला महापौरांचा खो?

news

नवी मुंबई : एपीएमसीजवळील ट्रक टर्मिनल व रेल्वे स्टेशनसमोरील मोकळया जागांवर प्रस्तावित गृहप्रकल्प शासनाने रद्द करावा. या प्रकल्पांमुळे पार्किंगसह इतर सार्वजनिक सुविधांवर ताण वाढण्याची शक्यता महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केल्यामुळे सिडकोच्या गृहप्रकल्पांना खिळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून यावर लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये एक लाख बांधकाम करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. रेल्वे स्टेशन, ट्रक टर्मिनलच्या भूखंडावर हे प्रकल्प उभारण्यात येणार असल्यामुळे त्याला विरोध होऊ लागला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी सर्वप्रथम याला विरोध दर्शविला आहे. प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर तत्काळ याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. रेल्वे स्टेशन व ट्रक टर्मिनलमधील प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. रेल्वे स्टेशनसमोर वाहतूक कोंडी वाढेल, अशी शक्यताही व्यक्त केली होती. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना नवीन सरकारने शहरा सहिताच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. शहराचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवी मुंबईमध्ये सार्वजनिक वापराच्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे शहराचे नुकसानच होणार असून तो प्रकल्प विद्यमान सरकारने रद्द करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. महापौरांच्या भूमिकेमुळे सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये एपीएसीजवळ असलेल्या एकमेव ट्रक टर्मिनलच्या जागेवरही गृहप्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, ट्रक टर्मिनलची जागा अवजड वाहने उभी करण्यासाठीही कमी पडू लागली आहे. जागा नसल्यामुळे एपीएमसी परिसरातील सर्व रोडवर अवजड वाहने उभी करावी लागत आहेत.

या ठिकाणी गृहप्रकल्प उभारल्यास पार्किंगचा प्रश्न अजून गंभीर होण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकल्प नको, अशी भूमिका नागरिकांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली आहे. सीवूड रेल्वे स्टेशनच्या जागेवर सिडकोने व्यावसायिक संकुल उभे केले आहे. यामुळे सीवूड रेल्वे स्टेशनसमोर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरामध्ये ध्वनिप्रदूषणही वाढले आहे. सिडको, सानपाडा व जाईनगर रेल्वे स्टेशनच्या समोरही गृहप्रकल्प उभारणार आहे. तो प्रकल्प उभा राहिला तर या परिसरामध्येही वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार आहे.

(PRAHAAR)

99 Days ago

Download Our Free App