नौदलाच्या कमांडर्सची यंदाची पहिली परिषद आजपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे या परिषदेचा पहिला टप्पा प्रथमच पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका, आयएनएस विक्रांतवर आयोजित करण्यात आला आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नौदल कमांडर्सना संबोधित करणार आहेत.
या परिषदेच्या माध्यमातून नौदल कमांडर्सना लष्करी-धोरणात्मक पातळीवरच्या महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. सरसेनाध्यक्षांसह भारतीय लष्कर प्रमुख आणि हवाई दल प्रमुखही नौदल कमांडर्सशी संवाद साधणार आहेत. नौदल प्रमुख नौदल कमांडर्ससह नौदलानं गेल्या सहा महिन्यांत हाती घेतलेल्या मोहिमा, विकास कार्यक्रम, मनुष्यबळ प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रम आदी बाबींचा आढावा घेतील.
भविष्यातील महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रमांबाबतही चर्चा केली जाईल. नौदलानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राबविलेल्या अग्निपथ योजनेच्या प्रगतीची माहितीही नौदल कमांडर्सना दिली जाईल. (AIR NEWS)