A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

आयपीएलची वेगळीच मज्जा, दर दोन दिवसांनी नव्या संघाची गाठ – विराट कोहली

News

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगची प्रकर्षाने आठवण येत आहे. या स्पर्धेत खेळण्याची वेगळीच मज्जा असल्याचे त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोहली म्हणतो की, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणा-या प्रत्येक द्विपक्षीय मालिका तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आजवर खेळत आहे. मात्र त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटपटूशी खुल्या मनाने मिसळता येत नाही. त्याच्याशी मुक्तपणे संवाद साधता येत नाही.

बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल टी-ट्वेन्टी स्पर्धेने जगभरातील क्रिकेटपटूंना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच सातत्याने तब्बल बारा वर्षे ही स्पर्धा खेळली जाते. या स्पर्धेत खेळण्याची मजा कुछ और है! परिणामी, आयपीएलमध्ये खेळायला सर्वच क्रिकेटपटूंना आवडते. या स्पर्धेतील वातावरण खूप वेगळे असते. माझेही आयपीएलवर खूप प्रेम आहे. आयपीएलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर दोन किंवा तीन दिवसांनी नव्या संघाशी दोन हात करायला मिळतात.’’

आयपीएलमध्ये विराट हा बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचे (आरसीबी) प्रतिनिधित्व करतो. त्याच्या नेतृत्वाखालील बंगळूरू संघात फटकेबाज सलामीवीर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल तसेच दक्षिण आफ्रिकेचा फटकेबाज सलामीवीर एबी डेविलियर्ससारखे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू खेळले आहेत. अशा ग्रेट क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंगरूम शेअर करण्याचा अनुभव अवर्णनीय असल्याचे कोहलीला वाटते.

‘‘आयपीएलमध्ये जगभरातील अव्वल क्रिकेटपटू खेळतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा असते. अनेक परदेशी क्रिकेटपटू तुमचे सहकारी असतात तर काही प्रतिस्पर्धी. स्टार क्रिकेटपटूंसोबत खेळण्याचा मोठा फायदा असतो. त्यातच माझ्या वाट्याला कर्णधारपद आले आहे. अव्वल खेळाडूंचा संघ असलेल्या बंगळूरुचे नेतृत्व करण्याचा मोठा आनंद आहे. प्रत्येक स्पर्धेप्रमाणे आयपीएलमध्येही अनेक आव्हाने असतात. मात्र आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्यात सर्व सहका-यांची सर्वोत्तम साथ लाभते,’’ असे कोहलीने सांगितले.

जगभरात दहशत माजवणा-या कोरोना विषाणूमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. कोरोना व्हायरसचा फटका आयपीएल स्पर्धेला देखील बसला आहे. यंदाची तेरावी आवृत्ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप पुढे ढकलल्यास किंवा न झाल्यास त्या कालावधीत किंवा वर्ल्डकपपूर्वीच्या आशिया चषक स्पर्धेच्या जागी आयपीएल खेळवली जावी, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड प्रयत्नशील आहे.

(PRAHAAR)

1439 Days ago