A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

एक इंचही मागे सरकणार नाही; भारताचे चीनच्या दादागिरीला जशास तसे उत्तर

News

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने सातत्याने स्थिरता आणि शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही चीनच्या सैन्याकडून भारतीय पेट्रोलिंग पथकाला अडवण्यात आलं. याशिवाय चीनकडून घुसखोरीचाही प्रयत्न केला जातोय. पण भारत एक इंचही माग हटणार नाही आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिल, अशी प्रतिक्रिया उच्चस्तरीय सरकारी सूत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आपले हितसंबंध अत्यंत दृढपणे निभावणार आहे, योग्य ती साधने तैनात केली जातील आणि शांततेसाठी संवादातून काम केलं जाईल. एलएसीवर भारतीय सैन्याकडून चीनची घुसखोरी ही रोखली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. कोरोना संकटामुळे ठप्प झालेलं सीमेवर पायाभूत सुविधांचं कामही भारत लवकरच सुरू करणार आहे. पण लष्करी तणाव कमी करण्यासाठी चीनला वार्ता करण्याचे दरवाजे नेहमी खुले आहेत, असंही दुस-या एका सूत्राने सांगितलं.

नियंत्रण रेषेच्या बाबतीत भारताने नेहमीच जबाबदारीची भूमिका घेतली आहे. पण चीनने नेहमीच या क्षेत्रात नियमांचं उल्लंघन केलं आहे. चीनचे हेतू काय आहेत हेही कळत नाही, अशी प्रतिक्रिया एका सूत्राने दिली. भारताकडून केलं जाणारं सर्व कामकाज आणि पेट्रोलिंग ही फक्त भारतीय हद्दीत केली जात होती, असं भारताने सांगितलं आहे.

भारतीय हद्दीत पेट्रोलिंग केली जात असतानाही चीनने त्यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूकडून यावर संवादातून मार्ग काढला जात आहे. पण प्रश्न जेव्हा सीमा संरक्षणाचा येतो, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं. संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकांनंतर ही भूमिका समोर आली आहे. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही चर्चा झाली होती. सीमेवर कोणताही एकतर्फी बदल होऊ देणार नाही, असा निर्णय भारताने घेतला आहे.

मेजर जनरल आणि ब्रिगेडियर स्तराच्या अधिका-यांनी आपापल्या स्तरावर आतापर्यंत चर्चा केली आहे. पण यातून कोणतंही समाधान समोर आलं नाही. त्यामुळे आता राजकीय आणि डिप्लोमॅटिक हस्तक्षेपाची प्रतिक्षा आहे. सूत्रांच्या मते, परिस्थिती गंभीर असली तरी भयावह नाही. चीन सैन्याला एकतर्फी कोणताही बदल करू दिला जाणार नाही. भारतीय हद्दीत अगोदरच चीनकडून १-३ किमीपर्यंत घुसखोरी करण्यात आली आहे.

भारतीय सैनिक त्यांच्या जागेवरुन एक इंचही मागे हटणार नाहीत. मात्र दोन्ही देशांमध्ये ठरलेल्या नियमांप्रमाणे कोणताही वाद होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. कर्णल, ब्रिगेडियर आणि मेजर जनरल यांच्या स्तरावर सातत्याने चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनचंही स्पष्टीकरण

सीमेवर भारतासोबतची परिस्थिती एकंदरित स्थिर आणि नियंत्रणात असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर चीनकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी वार्ताहरांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. भारत आणि चीनमध्ये संवाद आणि सल्लामसलतीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त साधने आहेत, असंही ते म्हणाले.

(PRAHAAR)

1421 Days ago