A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

क्षयरोगमुक्त पंचायतसह विविध ५ अभियानांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

news

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं जागतिक क्षयरोग परिषद झाली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी क्षयरोगमुक्त पंचायत अभियानासह नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला. यात भारतातील क्षयरोगविषयक अहवाल २०२३, फुफ्फुसाच्या क्षयरोगाशी संबंधित अतिरीक्त उपचारांकरता प्रशिक्षण प्रारुप, कौटुंबिक सेवा सुशृषा प्रारुप, क्षयरोग प्रतिबंधक उपचारांसाठी छोट्या स्वरुपातल्या आरोग्यविषयक पथ्यांचा, ज्या अंतर्गत केवळ औषधांच्या १२ मात्रांच्या वापरानं क्षयरोगाला प्रतिबंध केला जाईल, अशा उपक्रमांचा समावेश आहे. देशाला क्षयमुक्त करण्याचं उद्दिष्ट २०३० ऐवजी २०२५ मध्ये साध्य करण्याचं ठरवलं असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. क्षयरोगावरच्या उपचारासाठी जगभरात वापरल्या जात असलेल्या औषधांपैकी ८० टक्के औषधं आपल्या देशात तयार केली जात असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखीत केले.

विविध योजनांअंतर्गत क्षयरोगानं बाधीत ७५ लाख रुग्णांच्या खात्यात २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात दरवर्षी २४ लाख लोक क्षयरोगानं बाधीत होतात, त्यापैकी सुमारे ९४ हजार लोक दगावतात, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर लहान मुलं, आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांसह हजारो जण नी-क्षय मित्र होत, स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यासाठी पुढे आल्याचं त्यांनी सांगितलं.या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्र्यांनी निवडक राज्ये आणि जिल्ह्यांचा क्षयरोग निर्मूलनाच्या कामात केलेल्या प्रगतीबद्दल गौरवही केला. (AIR NEWS)

390 Days ago