A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात सिडनी इथं पोहचले

News

तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद मोदी आज संध्याकाळी ऑस्ट्रेलियात सिडनी इथं पोहचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच प्रधानमंत्री भारतीय समुदायालाही संबोधित करतील आणि ऑस्ट्रेलियातल्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यावसायिक प्रतिनिधींशीही ते संवाद साधणार आहेत. द्विपक्षीय बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराद्वारे व्यापार वाढ, अक्षय ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा सहकार्य मजबूत करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी आज पोर्ट मोरेस्बी इथं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांच्यासोबत भारत-प्रशांत द्वीपसमूह सहयोग मंचाच्या - तिसऱ्या शिखर परिषदेचं सह- अध्यक्षपद भूषवलं. संपूर्ण जग सध्या अन्न, इंधन, खतं आणि औषधांच्या जागतिक पुरवठा साखळीत नवीन आव्हानांचा आणि अडथळ्यांचा सामना करत असल्याचं त्यांनी या परिषदेला संबोधित करताना म्हटलं.

पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल, बॉब डाडा यांनी मोदी यांना ‘ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पॅसिफिक क्षेत्रातल्या बेट राष्ट्रांची एकता वाढवण्यासाठी आणि ग्लोबल साउथच्या समस्या मांडण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच प्रधानमंत्री मोदी यांना त्यांच्या जागतिक नेतृत्वासाठी फिजीच्या "द कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. (AIR NEWS)

331 Days ago