A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

दंगलीनंतर कोल्हापूर शहरातली परिस्थिती नियंत्रणात

news

कोल्हापुरातल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. कोल्हापूर शहरातली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावं. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. प्रशासनानं दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावं, या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, असं रेखावार यांनी सांगितलं.

नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केलं आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन सकाळपासूनच संपूर्ण शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी मागवली आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणांसह संपूर्ण शहरातून जमावाला पांगवलं आहे. हुल्लडबाजी आणि दगडफेक केलेल्यांना शोधून ताब्यात घेण्याची आणि पुढच्या कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं. (AIR NEWS)

316 Days ago