A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

देशातल्या नागरीकांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज

news

कोविड १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार थंडावल्याने रोजगाराला मुकलेल्या गरीबांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज ही घोषणा केली.

या अंतर्गत गरीबांना पुढचे तीन महिने प्रति व्यक्ती ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याशिवाय प्रति कुटुंब १ किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. मनरेगामधली रोजंदारीची रक्कम १८२ रुपयांवरून वाढवून २०२ रुपये केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या किसान सन्मान योजने अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या ६ हजार रुपयां पैकी २ हजार रुपयांचा पहिला हप्ता महिना अखेर पर्यंत जमा करण्याची तसेच इतरही घोषणाही यावेळी करण्यात आल्या.

निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवांच्या खात्यात १ हजार रुपये मानधन २ टप्प्यांत जमा करणार, २० कोटी महिलांच्या जनधन खात्यात येत्या ३ महिन्यात प्रत्येकी ५०० रुपये अनुदान दिले जाणार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना दर महिन्याला एक या प्रमाणे पुढचे ३ महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार, दीनदयाल ग्रामीण उपजीविका योजने अंतर्गत ६३ लाख महिला स्वयं सहायता गटांना २० लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार, संघटित कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचे ३ मासिक हप्ते सरकार भरणार, आजाराच्या साथीच्या कारणासाठी भविष्य निर्वाह निधीतून रक्क्म काढता यावी यासाठी त्याबाबतच्या नियमांमध्ये सरकार सुधारणा करणार आहे.

बांधकाम मजुरांसाठीच्या कल्याण निधीचा वापर राज्य सरकारांनी त्यांच्या मदतीसाठी करावा असे निर्देश केंद्राने दिले आहेत. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स आणि इतरांसाठी केंद्र सरकारने ५० लाख रुपयांच्या विम्याची घोषणा केली आहे. (AIR NEWS)

1484 Days ago