A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

परळचे ईएसआयसी रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घ्या : आ. आशीष शेलार

News

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कामगार विभागातर्फे चालविण्यात येणारे ईएसआयसी रुग्णालय हे परळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणी २०० खाटांची व्यवस्था आहे. या इमारतीचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी आणि उपचारांसाठी होऊ शकतो, असे पत्र भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

या रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडे संपर्क साधावा. या इमारतीचा सेव्हन हिलच्या धर्तीवर केवळ कोरोना रुग्णांसाठी म्हणून ताबा घ्यावा. तसेच, पोलिसांच्या मदतीला होमगार्डना या काळात कार्यान्वित करावे, अशी मागणी आमदार शेलार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या राज्यातील एकूण रुग्णांच्या आकडेवारीत मुंबईत सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून आले आहेत. मुंबई शहर दाटीवाटीचे असल्याने इथे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परळच्या ईएसआयसी हॉस्पिटलसह याच भागात असलेल्या कामगार विभागाचीच एनसीएच ही सात मजली इमारत सुद्धा उपलब्ध होऊ शकते. यामध्ये अशा रुग्णांना विलगीकरण कक्ष उभारून उपचार देणे शक्य होईल, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

राज्यात कर्फ्यू असतानाही अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. विशेषत: काही मुस्लीम वस्त्या आणि झोपडपट्टी भागात संध्याकाळी नागरिक रस्त्यावर बाहेर पडतात. तसेच, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असताना काही अडचणी निर्माण होत आहेत. या सर्वांचा ताण सध्या पोलिसांवर येतो आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीला होमगार्डचा उपयोग होऊ शकतो, असेही आमदार शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.

(PRAHAAR)

1483 Days ago