A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर राऊतांना धमकी देणारे दोन जण ताब्यात

news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शरद पवार धमकी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १५३ ए, ५०४, ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्याकडून या प्रकरणात कोणीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाणार आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्हीही गोवंडीतील राहणारे आहेत. नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शुक्रवार धमक्यांनी गाजला!

शुक्रवारी राज्याच्या राजकारणात दोन नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनाही फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

धमकी देणे खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कुठल्याही राजकीय व्यक्तीला धमकी देणे खपवून घेणार नसल्याचे म्हटले. तसेच या प्रकरणी गृहखाते तत्काळ कारवाई करेल, असे आश्वासन देखील दिले.

धमकी देणाऱ्याला दोन तासात अटक व्हायला हवी होती – जयंत पाटील

विरोधी पक्षाने मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका सरकारवर केली. जयंत पाटील यांनी टीका करताना धमकी देणाऱ्याला दोन तासात अटक व्हायला हवी होती, मात्र अद्याप अटक झालेली नाही असे म्हटले. जर खरच चौकशी झाली तर याचे मूळ कदाचित दाभोलकर हत्याकांडापर्यंत जाऊ शकेल असेही त्यांनी म्हटले.

धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही – शरद पवार

“तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरवर देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्थेवर मला विश्वास आहे, त्यामुळे याची मला चिंता नाही, असे शरद पवार म्हणाले.

कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सुत्रे आहेत.. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असे शरद पवार म्हणाले.

धमकीची मला कोणतीही चिंता नाही. कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करा

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा,” असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. जवळपास पाऊण तासाची ही भेट होती.

“महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, असं फडणवीस म्हणाले.

ट्विटर हँडलरवर कारवाई करा – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन करण्यात आली.

शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात सध्या दडपशाही आणि गुंडगिरी सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून ज्या घटना घडत आहे, ते राज्याच्या गुप्तचर खात्याचं अपयश आहे. या घटना कशा घडतात. एवढा द्वेष कुठून येतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मीरा रोड हत्येप्रकरणी देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. महिलांबाबत सातत्याने घटना घडत आहे. गृहखात्याचं हे अपयश आहे. बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात आणि या घटना कशा घडतात असा सवाल उपस्थित केला आहे.

धमकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस फाटा त्यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी येत असतात. मात्र आज या कोणालाही या परिसरात येऊ दिलं जात नाही आहे. फक्त राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाच त्यांच्या घराच्या परिसरात थांबू दिलं जात आहे. घराबाहेर महिला पोलीस देखील तैनात आहेत. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता, फेसबुक बायोमध्ये उल्लेख, मास्टरमाईंड शोधा : अजित पवार

सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुकवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे?, याचा तपास व्हायला हवा आणि सरकारने त्याच्यावर योग्य कारवाई करायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

‘पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही बाहेर असल्याने संपर्क झाला नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याचा तपास करावा आणि सौरभ पिंपळकर याला कोणाचा पाठिंबा आहे का? याचाही तपास करावा. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि कारवाई करावी.

सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरला औंरंगाबादच म्हणणार असं शरद पवार म्हणाले अशी चुकीची बातमी एका माध्यमाने दिली होती. त्यानंतर त्यांंनी ट्विटरवर दिलगिरीदेखील व्यक्त केली मात्र बातम्या देताना खातरजमा करत चला, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अन् त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता. सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद करा अन्यथा तुम्हाला गोळ्या घालू, असं ही अज्ञात व्यक्ती म्हणाली. राऊतांनी मुंबई पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

(PRAHAAR)

314 Days ago