केंद्रीय दूरसंचार विभागानं ५ जी सेवेसाठीच्या स्पेक्ट्रमचं वितरण दूरसंचार कंपन्यांना केलं आहे. आता दूरसंचार कंपन्यांनी लवकरात लवकर ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करावी, असं आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. पुढच्या महिन्यापर्यंत ५ जी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
स्पेक्ट्रमसाठीचे ८ हजार ३१२ कोटी रुपये दिल्यानंतर एअरटेलला काही तासातच स्पेक्ट्रमच्या वितरणाचं पत्र देण्यात आलं. वेगानं ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनिल मित्तल यांनी कौतुक केलं आहे. ५ जी साठी आवश्यक सामग्री खरेदी करण्याची प्रक्रिया दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच सुरू केली आहे.
१ ऑगस्ट रोजी पूर्ण झालेल्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला ५ जी स्पेक्ट्रम मिळाले आहेत. अदानी डेटा नेटवर्कनंही व्यावसायिक ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. (IMPUT FROM AIR )