A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक लढत आजपासून

news

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आज अहमदाबादच्या खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यामुळे डब्ल्यूटीसीच्या दृष्टीने भारतासाठी ही निर्णायक लढत असून मालिका वाचविण्यासाठी पाहुण्यांची धडपड असेल.

चार सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. दरम्यान मालिकेतील गेल्या तीन सामन्यांचा निर्णय तीन दिवसांच्या आतच लागला होता. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यातील खेळपट्टीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या मैदानावर दोन खेळपट्ट्या असून सध्या त्या झाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजेच, हा सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार? याचा काल सायंकाळी उशीरापर्यंत खुलासा करण्यात आलेला नव्हता. दोन खेळपट्ट्यांपैकी एक खेळपट्टी हिरवीगार असल्याचे म्हटले जात आहे. याच खेळपट्टीवर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तसे झाल्यास अहमदाबाद कसोटीची मदार वेगवान गोलंदाजांच्या खांद्यावर येईल, असे जाणकारांना वाटते.

मालिकेतील चौथा कसोटी सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल, हे सामन्यापूर्वीच कळेल. अशा परिस्थितीत खेळपट्टी कशी असेल? याचा अंदाज लावता येणार नाही. दरम्यान, २०२१ मध्ये याच मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने खेळले गेले होते. हे दोन्ही सामने दोन वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळवले गेले. यापैकी एक कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला होता.

पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा चौथा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीजही अहमदाबादला पोहोचणार आहेत. दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

(PRAHAAR)

407 Days ago