A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता

news

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं मंडौस चक्रीवादळ ममल्लापुरमपासून सुमारे १८० किमी आग्नेय आणि चेन्नईच्या सुमारे २१० किमी वायव्येकडे सरकलं आहे.
चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा दरम्यान ममल्लापुरमच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि परिसरात कालपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेच्या तुलनेत सरासरी पावसाचं प्रमाण खूपच कमी असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं. चक्रीवादळामुळे उद्याही शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
चक्रीवादळ पुढे सरकत असताना विमानतळ,रेल्वे आणि इतर वाहतूक सेवांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागानं मदतीच्या बाबतीत आपत्कालीन हेल्पलाइन सुरू केली आहे.
चेन्नई मेट्रो रेल्वे सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे चालू राहणार आहे. परिवहन विभाग पुद्दुचेरीच्या मार्गावर असणारी परिवहनसेवा रात्री उशिरा नंतर बंद करणार आहे. हवामान विभागाच्या पुढील अहवालाच्या आधारे उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केली जाण्याची शक्यता आहे. पाच फुटांपेक्षा जास्त उंच लाटा उसळल्यानं किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात केलं आहे. लोकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये यासाठी सरकारनं सूचना जारी केल्या आहेत. राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्र जिल्हा अधिकाऱ्यांना सतर्क करत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
चक्रीवादळ मंडौस जमिनीवर आल्यानंतर तीन तासांच्या आत कमकुवत होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. उद्या उत्तरेकडील तामिळनाडूच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (AIR NEWS)

494 Days ago