A part of Indiaonline network empowering local businesses

मकरसंक्रांतीच्या सणाचा सर्वत्र उत्साह

news

राज्यात मकरसंक्रातीचा सण उद्या साजरा होणार असला तरी देशाच्या उत्तरेकडे मात्र आजच मकर संक्रात साजरी होत आहे. कर्नाटकात हा सण पोंगल नावाने तर पंजाबात लोहडी आणि उत्तरायण नावानं साजरा होतो.

गुजरातमध्येही संक्रातींचा सण रंगीबेरंगी पतंग, उंधियो, जिलेबी, चिक्की यासह विविध खाद्यपदार्थांच्या साथीनं साजरा केला जातोय. गेली २ वर्ष कोरोनामुळं असलेले निर्बंध यंदा नसल्यानं लोकांच्या उत्साहात भर पडली आहे. मकरसंक्रातीच्या दिवशी देवदर्शन आणि दानधर्माला विशेष महत्त्व असल्यानं मंदिरांमध्येही नागरिकांनी गर्दी केली आहे. अमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचा जल्लोष शिगेला पोचला आहे. जगभरातले ८०० हून अधिक पतंग उडवणारे यंदा या महोत्सवात सहभागी झाले आहेत. यंदा एकाचवेळी अधिकाधिक पतंग उडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहे.

यंदा भारताकडे जी २० समुहाचे अध्यक्षपद असल्यानं या महोत्सवात त्या दृष्टीने विशेष तयारी केली आहे. यंदा अमदाबाद व्यतिरीक्त सुरत, बडोदा, राजकोट, द्वारका, सोमनाथ आणि केवडियामध्येही आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे. पतंग उडवण्यचा खेळ हे संक्रांतीच्या सणाचं वैशिष्ट्य. मात्र त्याच्या धारदार मांजामुळे इजा होऊ शकते. त्यामुळे अनेक ठिकाणी घातक मांजावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी नायलॉन मांजाला बंदी घातली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत मुंबईत नायलॉन मांजा वापरता येणार नाही, असं या आदेशात नमूद आहे. पतंगांच्या मांजामुळं जखमी झालेल्या पक्षांसाठी गुजरात सरकारनं करुणा अभियान सुरू केलं आहे. या अंतर्गत राज्यभरात ८६५ पक्षी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. साडे सातशेहून अधिक डॉक्टर आणि ८ हजाराहून अधिक स्वयंसेवक या अभियानात पक्ष्यांच्या मदतीसाठी सहभागी झाले आहेत. Read more (AIR NEWS)

482 Days ago