A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मराठा समाज आक्रमक, आजपासून रोखणार मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा

news

कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार पाटील आणि तोडकर यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली असून एक संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी नेत्यांशी आज यासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांपूर्वी याचिका करणारे आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली. जी समिती नेमली आहे ती विविध तज्ञांसोबत चर्चा करत आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली.

“आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलो आहोत. विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका गोष्टीचं समाधान आहे ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सरकारसोबत आहोत हे वचन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला होता. आरक्षण देण्यासाठी सर्वजण वचनबद्द आहोत. आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न होता. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

(PRAHAAR)

1310 Days ago