A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन

news

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात बाणेर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रारंभी मुंबई आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर १९७३ मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, त्यानंतर १९८९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले.

१९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, अर्थात भारतीय वृत्तपत्र परीषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परीषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते. देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

२००२ मधल्या गुजरात दंगल प्रकरणी नियुक्त न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर चौकशी समितीचे ते सदस्य होते, तर २००३ मध्ये तत्कालीन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीचे ते प्रमुख होते.

न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. न्याय आणि विधी क्षेत्रात मोलाचे कार्य करतानाच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीत निर्भीड आणि परखड विचारधारा कायम राहावी यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्यानं या दोन्ही क्षेत्रासाठींचं मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना आदरांजली वाहिली आहे. (AIR NEWS)

1159 Days ago