A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला सुरुंग?

News

मीरा रोड (प्रतिनिधी) : मीरा भाईंदरमध्ये भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हेमंत म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. म्हात्रेंनी, यापुढे पक्षाचे निष्ठावंत व पात्रता पाहूनच पदे दिली जातील असे स्पष्ट करत कोणाचा दबाव खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. मेहतांविरोधात भाजपात असलेला असंतोष व त्यातुनच म्हात्रेंची नियुक्ती आणि त्यांनी दिलेला इशारा हा मेहतांबाबत असल्याचे मानले जाते. तर म्हात्रेंना शुभेच्छा देताना अनेकांनी मेहतांच्या फोटोला कात्री लावली आहे.

मीरा भाईंदर हा भाजपाच्या मोठ्या प्रमाणातील मतदारवर्गामुळे हमखास विजयाचा मतदारसंघ पक्ष स्तरावर मानला जात होता. परंतु २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर नगरसेविका गीता जैन यांनी सर्वपरीने बलाढ्य असे वादग्रस्त नरेंद्र मेहतांना पराभवाची धूळ चारली. भाजपाचा मतदार असून देखील चुकीचा व लोकांमध्ये असंतोष असलेला उमेदवार दिल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली.


वास्तविक मीरा भाईंदर भाजपाची सर्व सुत्रे मेहतांच्या हातीच देण्यात आली होती. पण सुरवातीपासूनच ते सातत्याने विविध प्रकरणात वादग्रस्त राहिले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत असताना गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारी व आरोपसुद्धा वाढतच राहिले. भाजपा तर स्वत:ची खासगी कंपनी म्हणून वापरत असल्याचे आरोप भाजपातूनच झाले. मेहता व त्यांच्या ७११ कंपन्यांनी शहरात स्वत:चे झटपट मोठे साम्राज्य उभे केले. भाजपासह महापालिकेतदेखील त्यांच्या मर्जीनुसार कामकाज चालू लागले.


२०१५ मध्ये जिल्हाध्यक्ष झालेले हेमंत म्हात्रे हे संघ व भाजपाचे जुने कार्यकर्ते असले तरी तेदेखील मेहतांच्या मर्जीबाहेर नव्हते. नव्हे मेहतांमुळे पद मिळाले असे मानले जात होते. मेहतांकडे असलेली आमदारकी, पालिकेत महापौर भावजय, प्रशासनावर पकड आणि थेट फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे मेहतांविरोधात बोलण्यास कोणी नगरसेवक, पदाधिकारी धजावत नसे.
परंतु विधानसभा निवडणुकीत लोकांनी मेहतांना धोबीपछाड दिली आणि मेहतांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी मेहतांविरोधात उघडपणे भूमिका घेण्यास सुरवात केली. महापौर पदाच्या निवडणुकीत मेहता समर्थक रुपाली मोदींना बाजुला सारुन ज्योत्स्ना हसनाळे यांना महापौरपदी बसवत मेहता विरोधकांनी मोठा धक्का दिला.
मेहतांचा अर्धनग्न अवस्थेतील वादग्रस्त व्हिडीओ सार्वजनिक झाल्यावर मेहतांनीच राजकारण व भाजपा सोडत असल्याचे जाहीर केले होते. भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादीवरुन मेहतांवर बलात्कार, अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ती नगरसेविका पहिली पत्नी असून तिचा मुलगा हा मेहतांचा असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामुळे आधीच वादग्रस्त मेहतांवर भाजपा आणि राजकारण सोडण्याचे जाहीर करण्याची नामुष्की ओढवल्याचे मानले जाते.

(PRAHAAR)

1382 Days ago