मास्को (वृत्तसंस्था) : पहिल्यांदाच भारतानं आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणा-या वर्षिक परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. परंतु २४ जून रोजी पार पडणा-या या परेडमध्ये लष्कर, हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार आहे. रशियानं या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान त्या परेडमध्ये सहभागी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु भारतीय सैन्याची तिन्ही दलांकडून आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं जाणार आहे.
रशियामध्ये दरवर्षी ९ मे रोजी विजय दिवसाच्या निमित्तानं या परेडचं आयोजन केलं जातं. परंतु कोरोनामुळे यावेळी त्याचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. १९४५ मध्ये नाझी जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्यावर्षी व्लादिवोस्तोकमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, आता भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ७५ ते ८० जवान १९ जून रोजी या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.
यावर्षी रशियाच्या विजयी दिवसाचं ७५ वं वर्ष असल्यानं रशियानं अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धामध्ये भारतीय सैनिकांच्या योगदानाचा संदर्भ देऊन परेडमध्ये भारताची टीम सहभागी होण्याची शक्यता आहे.