A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

राज्यात आजही अनेक ठिकाणी दमदार पाऊस

news

राज्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रभर आणि आज सकाळी मुसळधार पाऊस कोसळला. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात असून जिल्ह्यातले तब्बल २९ मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे दीड मीटरनं उघडले असून, त्यातून ३ लाख ५७ हजार क्यूसेक पाणी सोडलं जात आहे. यामुळे वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला असून, आज दुपारपासून गडचिरोली-नागपूर मार्गावरचं दळणवळण बंद झालं आहे. तेलगंणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पाच्या ८५ दरवाज्यांमधून ७ लाख १६ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातली पूरस्थिती कायम आहे.

पर्लकोटा नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून पुराचं पाणी भामरागड गावात शिरलं आहे. बाजारपेठेतली दुकानं आणि ५० घरे अद्यापही पाण्याखाली आहेत. पूरबाधित २२ गावांमधल्या २ हजार ३३७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. सध्या गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-भामरागड हे प्रमुख मार्ग बंद आहेत. वर्धा जिल्ह्यात पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमधल्या शेकडो घरांमधे पाणी शिरलं आहे. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे आज सकाळी सव्वा ६ वाजता उघडले आहेत. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातून प्रतिसेकंद १ हजार ६२५ घनमीटर पाणी वर्धा नदी पात्रात सोडलं जात आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी पात्राच्या दोनही काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वाशिम जिल्याच्या कारंजा तालुक्यात धनज बुद्रुक परिसरात काल रात्रीपासून धुंवाधार पावसाला सुरु झाला. बेंबळा नदीला पूर आला असून नदीकाठच्या आंबोडा, सिरसोली या गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे. बेंबळा नदी अमरावती आणि वाशिम सीमेलगत साखरा इथून वाहत असल्यानं अमरावती जिल्ह्यातल्या साखरा, चाकोरा, वाढोणा सिद्धनाथपुर या गावांचा संपर्क तुटला आहे. या संततधार पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मंगरुळपिर तालुक्यात वनोजा इथल्या नाल्याला पूर आल्यानं माळसेलू, पिंजर परिसरातल्या गावांचा संपर्क तुटला आहे. मालेगाव तालुक्यात काटेपूर्णा नदीला मोठा पूर आला आहे, कुत्तरडोह अमानवाडी दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीवरील पुलावर पुराचे पाणी आल्यानं कुत्तरडोह, रामराव वाडी, पिंपळसेंडा या गावचा संपर्क तुटला आहे.

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांना पुरानं वेढा घातला आहे. वर्धा आणि रामगंगा या नद्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. वरुड जहांगीर, नागठाना, गुजरी, सावंगी, झाडगाव, रामगँगा, एकबुर्जी, भांब, रावेरी, चहांद, पिंपळखुटी या गावांमधे पुराचं पाणी शिरलं आहे. वर्धा नदीवर रामथीर्थ गावाजवळचा पूल पाण्याखाली आला आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा पूल असून त्याच्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्यानं वाहतूक थांबवली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदी काठावरच्या गावांमधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातील कालखेड इथल्या नदीला पूर आल्यानं परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे, जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस चालू असल्याने पूर्णा आणि पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत.

नाशिक जिल्ह्यातली ९ धरणं भरली असून, १९ धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या दारणा गंगापूर आणि तत्सम धरणातून २४ टीएमसी पाणी मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाकडे वळवलं आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार सुरु आहे. पैठणच्या जायकवाडी जलाशयाच्या पातळीत आणखी वाढ झाली असून जिवंत साठा ७४ टक्क्यांच्यावर गेला आहे. धुळे जिल्ह्यातही संततधार सुरु आहे. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस होत आहे. अक्कलपाडा, जामखेल आणि बुराई धरणातून आज सुध्दा पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत आहे. सध्या पाणीपातळी ३६ फुट ३ इंच इतकी आहे. तर ४६ बंधारे पाण्याखाली आहेत. (AIR NEWS)

640 Days ago