दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील झाल्यामुळे देशभरात काल रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. राज्याच्या अनेक भागात रंग पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा असली तरी काल बहुतांश भागात धुळवड आणि रंगोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या गावांमध्ये धुळवड साजरी करण्याची एक अनोखी परंपरा आहे.
जालन्यातील हत्ती रिसाला उत्सव समितीच्या होळीला १३३ वर्षांची परंपरा आहे. इथं धुळवडीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते. पूर्वी हत्तीवर विराजमान असलेला राजा प्रसाद रूपाने रेवडी फेकायचा आणि लोक प्रसाद म्हणून ती रेवडी स्वीकारयचे अशी प्रथा होती. आता प्रतीकात्मक लोखंडी हत्तीवर बसलेली व्यक्ती राजाच्या रुपात मिरवणूक मार्गावर रेवडी फेकते. ज्या ठिकाणाहुन मिरवणूक जाते त्या मार्गावरील लोक होळी खेळणं तात्पुरतं बंद करतात. या मिरवणुकीत, वारकरी, लाठ्या काठ्या, मुदगल यांचंदेखील सादरीकरण असतं. इथले लोक पाण्याच्या रंगाऐवजी गुलाल आणि फुलांची उधळण करत धुळवड साजरी करतात.
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात असलेल्या विडा गावामधली धुळवडीची प्रथा तर अगदी अनोखी आहे. तिथं यादिवशी गावातल्या नवीन जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीसमोर गावातले तरुण रंगांची उधळण करतात आणि मिरवणूक संपल्यावर जावयाला अहेरही केला जातो.
वर्धा जिल्ह्यातल्या सुरगावात गेली २५ वर्ष रंगांविना धुळवड साजरी केली जाते. धुळवडीच्या दिवशी इथं राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करणारी पदयात्रा काढली जाते आणि या पदयात्रेत गावातले लहानथोर सर्व नागरिक सहभागी होतात.
अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गाव रंगवण्याचा आगळा उपक्रम धुळवडीनिमित्त हाती घेतला होता. यात गावातील प्रत्येक मार्गाला वैशिष्ट्यपूर्ण नाव देऊन त्यावर शासकीय योजना आणि लाभांची माहिती देणारी चित्रं रंगवण्यात आली.
अमरावतीच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवासस्थानी बंजारा समाजासोबत धुलीवंदन साजरं केलं.कोकणात तर शिमग्याचा मोठा उत्साह असतो. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येनं चाकरमानी शिमग्यासाठी गावात आले आहेत. जिल्ह्यात काही गावांमध्ये सात दिवस शिमगोत्सव साजरा होतो. काल तरुणाईसह आबालवृद्धांनी रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
वाशिम इथं चेतन सेवांकुर या अंधनिवासातल्या कलाकारांनी भटकंती करणाऱ्या समुहातल्या मुलांबरोबर होळी साजरी केली. या समुहाच्या पालांवर जाऊन त्यांनी मुलांना खाऊ वाटला आणि विविध गाणी सादर केली.
ठाण्यात जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय राजकीय नेते, पत्रकार आणि अन्य नागरिकांसोबत धुळवड साजरी केली. विविध गृहसंकुलांमध्येही नागरिकांनी रंगांची मनसोक्त उधळण केली.बुलडाणा शहरात पोलिसांनी पोलिस मुख्यालयात होळी साजरी केली.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी काठी संस्थानाच्या होळीच्या रंगात आदिवासी बांधवांसोबत अधिकारी देखील रंगले होते. यावेळी आदिवासी नृत्यामध्येही अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातली मानाची राजवाडी होळीदेखील पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा बांधवांनी लठमार होळी साजरी केली. राज्याच्या सर्वच भागात आबालवृद्ध रंगांचा हा उत्सव साजरा करताना विविध रंगांमध्ये रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. (AIRNEWS)