A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

रिक्षा चालकाची मुलगी बनली वीटभट्टीवरील चिमुकल्यांची शिक्षिका

news

मुरबाड: वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरळ बिरदोलेतील बारावीत शिकणारी भाविका भगवान जामघरे या तरुणीनं ‍पुढाकार घेतला आहे. तिने वीटभट्टीवरच शाळा सुरू केली असून सध्या ती ४५ मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे सहा मुले आज आश्रमशाळेत आपले शिक्षण घेत आहेत.

कर्जत मधील भाविका हिचे वडील खरंतर रिक्षाचालक आहेत. नेरळपासून दामत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वीटभट्ट्या आहेत. या भागातून प्रवास करताना बिरदोलेतील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भाविकाला वीटभट्टीवर लहान मुले खेळताना अथवा आईवडिलांच्या कामात मदत करताना दिसली.

कमी उत्पन्न घरातून आलेल्या भाविकाला या मुलांच्या शिक्षणाची चिंता गप्प बसू देत नव्हती. स्वत: आर्थिक परिस्थीती उत्तम नसतानाही वडिलांकडे तिने वीटभट्टीवरील मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्‍त करताच वडिलांनीही तिला मदत केली. त्‍यांनी पाटी, पेन्सिल, पुस्‍तके खरेदी करून दिली आणि भाविकाने १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये बालदिनी अनौपचारिक शाळा सुरू केली.

कर्जतमधील दुर्गम भागात राहणारे आदिवासी, कातकरी समाजातील कुटुंबे वीटभट्टी कामगार कायम स्थलांतर करीत असतात. परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. मात्र, शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाने शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीमही सुरू केली. पण तरीही अनेकदा वीटभट्टी लांब असल्याने ही वीटभट्टी कामगारांचे मुले शाळेत जाण्यासाठी निरुत्साही दिसून येतात. मात्र, भाविकाच्या या पाऊलामुळे या वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबात ज्ञानाचा दिप उजळत आहे.

दामत येथील वीटभट्टी मालकांनीही सर्व शाळाबाह्य मुलांना एकत्र करण्यासाठी मदत केली शिवाय शाळेसाठी एक खोलीही उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला २५ मुलांनी सुरू झालेल्‍या शाळेत आज ४५ मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना शिकवण्यासाठी भाविकाने त्‍यांची बोली भाषाही आत्‍मसात केली आहे.

(PRAHAAR)

403 Days ago