शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु, गुरुनानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त आज ‘प्रकाशपर्व’ साजरं केलं जात आहे. पंजाबमधे कपुरथळा जिल्ह्यात सुलतानपूर लोधी इथं आयोजित समारंभाला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी गुरु नानक यांनी १५ वर्ष वास्तव्य केलं होतं, आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.
प्रकाश पर्वानिमित्त पंजाबमधली अनेक शहरं रोषणाईनं उजळून निघाली आहेत. अमृतसरमधलं सुवर्णमंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीनं सजलं आहे. नगर-कीर्तनं, लंगर यांसारखे अनेक कार्यक्रम आज दिवसभर होणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आज नांदेडमधल्या ‘हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराला’ भेट देणार असून, लंगरमधे सहभागी होणार आहेत. याशिवाय ५५० रोपट्यांची लागवड करण्याचा कार्यक्रमही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुनानक यांच्या जीवनावर आधारित, आयोजित प्रदर्शनाला ते भेट देणार आहेत.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रकाशपर्व सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त दुबईतल्या भारतीय उच्चायुक्तालयावर रोषणाई केली आहे. नेपाळमधेही विविध ठिकाणी आज भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. गुरुनानक देव यांचा जन्म चौदाशे एकोणसत्तरमधे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस प्रकाशपर्व म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक हे थोर तत्वज्ञ, समाजसुधारक, विचारवंत आणि कवी होते. (AIR NEWS)