मुंबई (प्रतिनिधी) : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात आत्तापर्यंत २४६ जणांनी प्लाज्मादान केले आहे. तर १० हजारांहून अधिक जणांनी रक्तदान केले आहे.
याचबरोबर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कोरोना संकट काळात सेवा बजावताना मुंबई व राज्यातील शहीद झालेल्या ९१ पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबीयांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तर गलवान खो-यात देशासाठी शहीद झालेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रुपए देण्यात आले.
याशिवाय, ४ मे ते ४ जून या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळपास २९ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटप केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.
(PRAHAAR)